क्रांतिकारी मरण |
अखेरचा सूर्योदय बघणारा माणूस सर्व शक्त्यांसमोर गुडघे टेकवतो. न्यायाधीश, राष्ट्रपती आणि समाज यांना दयायाचना करून त्याने क्षमेचा आटोकाट प्रयत्न केलेला असतो. सगळ्या भिका, लबाड्या, डावपेच निष्कामी ठरल्यावर, दगडाच्या भिंतीमधून भुतासारखे पार होणे अशक्य आहे हे जाणवल्यावर हा अपराधी धार्मिक साहित्य मागवून घेतो. अधाश्यासारखा देवाचा शोध घेऊ लागतो. धर्मपंडिताला भेटून दयाळू परमात्म्याचा किंवा मृत्यूपलीकडील जीवनाचा भ्रम स्वीकारतो आणि स्वत:चे सांत्वन करतो. मरण कसे स्वीकारणार? काही मैल दूर मरणाच्या दारात आडव्या असलेल्या व्यक्तीच्या रक्तात डाॅक्टर अफूचे रेणू सोडतात. सत्तर वर्षे जिवाला काचेच्या मूर्तीसारखे जपून जगलेल्या म्हाता-याला आता त्या मूर्तीला घरंगळत जाऊन फुटताना बघणे अशक्य ठरते. हजारो सूर्यास्त बघितले तरी उद्याचा बघायला मिळणार नाही ह्या कल्पनेने त्याची पाचावर धारण बसते. मृत्यूभयाने गलितगात्र झालेल्या माणसाला ती अफू आलिंगन देते. प्रेमाने कुरवाळते. कडेलोट झालेल्या त्या बिचा-याला पंखांचा भास होतो. फाशी, सूळ, हत्ती, विष किंवा विजेची खुर्ची पाहणा-या माणसाचे असले रासायनिक लाड केले जात नाहीत. कोठडीतून त्याला फरफटत आणले जाते. मग सोवळ्या पोशाखाखाली ढेरी लपवणारा एक माणूस समोर येतो. मरणान्मुखाला लाकडी खुर्चीवर बसवून मानसिक अफू देतो. अतिकाैशल्याने तो कैद्याचे सांत्वन करतो, देवाच्या प्रेमावर श्रद्धा ठेवून स्वत:ला झोकून द्यायला सांगतो. काळी पिशवी रडके लाल डोळे झाकेपर्यंत तो प्रेमाचे स्मित ताणतो. मानेने लटकणा-या देहाने आचके देणे बंद केले की जेलरशी चहा पीत ताज्या लफड्यांच्या चर्चा करतो. ठरावीक रक्कम गोळा केल्याची सही करून सायकलवर टांग मारून निघून जातो. हा ऎतिहासिक अनुभव आहे. घड्याळ्याचे ठोके मोजून खूण करणा-या सरकारी नोकराने सगळ्या धाग्यांचे इसम पाहिलेले असतात. स्वत:ला सिकंदराचे अवतार समजणारे, कोणाच्या बापाला घाबरत नाय सांगणारे शूरवीर शेवटच्या घटकेस पायी गडाबडा लोळून माफी मागणार ह्याची त्याला खात्री असते. त्यामुळे जेव्हा एक तरुण गात, हसत लाकडी पाय-या चढतो तेव्हा त्याला खडबडून जाग येते. कोण आहे हा जो प्रार्थना करेना? ज्याला दोन दिवस आधीच फाशी मिळणार कळाल्यावर लेनीनचरित्र वाचून होणार नाही ह्याचीच खंत झाली? ज्याने खुन्यांसारखी फाशी नको, शत्रुसैनिकांसारख्या गोळ्या घाला असे पत्र लिहिले? ज्याने एकही दयेचा अर्ज लिहिला नाही? मरणाची भीती कशी वाटत नाही ह्या इसमाला? मरणाच्या लाकडावर अनवाणी उभा राहून हा शांतपणे आकाशातल्या घारी चिमण्या कसा न्याहाळू शकतो? ह्याच्या डोळ्यात बघावे तर त्याची धारधार नजर पांढरपेश्या सबबींची शंभर वस्त्रे फाडेल. त्याच्याशी बोलावे तर त्याचे बोल आत दडलेली माणुसकी जागी करतील आणि जन्मभर काटा बनून रेशमी उशीवर झोपू देणार नाहीत. तो नास्तिक भगतसिंह होता. भगतसिंह आंधळ्यांच्या राज्यात डोळस होता. भरकटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांसाठी तो ध्रुव तारा होता. अंधश्रद्धेच्या मायाजालात तो भक्कम जमीन होता. वाळून कोलमडलेल्या झाडाला लागलेली तो पालवी होता. आपल्या सर्वांना तो माहीत आहे. पण त्याने आणि बीके दत्ताने असेम्ब्ली मध्ये बॉम्ब फेकेपर्यंत त्याचे नाव कोणाला ठाऊक नव्हते. साउंडर्सचा खून कोणी केला ह्याचा उलगडा झालेला नव्हता. त्याच्या ह्या धमाकेदार कृत्याने अचानक देश हादरला. बॉम्ब का फेकला ह्याचा इतका बिनतोड जवाब त्याने दिला की त्याच्या विषयी लगेच सहानभूती तयार झाली आणि लोक उघडपणे त्याचे समर्थन करू लागले. तेराव्या चौदाव्या वर्षांपासून तो लेख छापत होता. कॉलेज मध्ये तो लायब्ररीत दिवसरात्र घालवी. त्याच्या घरी क्रांतिकारी वारसा होता. त्याने सरकार किती खोटे बोलते, कोणत्या टोकाला जाऊ शकते बघितलेले होते. क्रांतिकारी बनलेली व्यक्ती परंपरेच्या किंवा हुकुमाच्या जोरावर पाजलेले ज्ञान आधी ओकून देते. मूलभूत मानवता आणि समानतेच्या जोरावर पुनश्च् अभ्यास सुरू करते आणि स्वतःच्या निष्कर्षांवर पोहोचते. त्याने अराजकतावादी आणि समाजवादी लिखाण वाचणे सुरू केले. जगातल्या बाकी क्रांतिकारकांशी त्याची ओळख झाली. तो म्हणतो की त्याला लक्षात आले की ते सर्व नास्तिक आहेत किंवा होते. क्रांतिकारी विचार त्या त्या काळातले सर्वात पुढारलेले विचार असतात. क्रांतिकारी माणुसकीसाठी स्वतःच्याच सरकार विरोधात युद्ध पुकारतात आणि जीवाची बाजी लावतात. ह्यामुळे त्यांना अंधश्रद्धा, अवैज्ञानिक किंवा विज्ञानभासी अशा कोणत्याही चुकीच्या विचारांना बळी पडणे परवडत नाही. चुकीच्या लोकांवर विश्वास किंवा चुकीच्या विचारांमुळे जीव जातो. कोणतेही झापड लावून जगता येत नाही. डोळ्यात तेल घालून जगावे लागते. क्रांतिकारी स्थित विचारधारेच्या बाहेर जगत असल्याने ते हातामागे काहीही न राखता सत्य बोलून टाकतात. भारतात बाकीही नास्तिक आहेत आणि आस्तिक लोकांना ते आवडतातच असे नाही. पण भगतसिंह सगळ्यांच्या हृदयात घर करून आहे. का बरे? कारण तो स्वातंत्र्यासाठी फाशी गेला. जेलमधून पळून जाता आले असते, माफी लिहून बिहून बघितली असती पण त्याने तसे बिलकूल केले नाही. त्याला ठाऊक होते की तो संपूर्ण भारताचा स्वाभिमान आहे. फाशी जाताना तो जेलरला म्हणाला की बघा, हिंदुस्थानी क्रांतिकारी कसे मरणाला सामोरे जातात. हा सूर्य, हा सिंह ह्याच भूमीत पैदा झाला ह्याचा आपल्याला अभिमान आहे, आणि तो त्यासाठीच मागे हटला नाही. मस्त पैसे लाटता येतील, पंतप्रधान बनता येईल म्हणून तो राजकारणात घुसला नव्हता. त्याने क्रांतीसाठी, शोषित वर्गासाठी लढा दिला आणि जीव जाईल माहीत असून सुद्धा पोलिसांना हवाली देऊन टाकली, फक्त कोर्टात पोहोचून लोकांपर्यंत क्रांतीची घोषणा जावी म्हणून. गोरगरिबांसाठी जगाला आणि मेला, भगतसिंह सरदार होता. त्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यातून त्याच्या बद्दल वाचताना पाणी येते. त्याची नास्तिकता आणि त्याचे क्रांतिकार्य महत्त्वाचे आहे, ते निगडित आहे. क्रांतिकारी लिखाणामध्ये दोन प्रकारच्या आत्महत्यांबाबत बोलले जाते. एक असते प्रतिकारी आत्महत्या आणि दुसरी क्रांतिकारी आत्महत्या. क्रांतीचा मार्ग स्वीकारल्यावर मरण येणार हे त्यांना ठाऊक असते. क्रांतिकारी मुख्यतः दगावतात, पण त्यांच्यात आपापसात बलिदान खूप आदरणीय समजले जाते. इथे मुख्य गोष्ट लक्षात घ्या. आपण साधी माणसे मरणाच्या भीतीत जगतो. मऊ मुलायम असत्ये स्वीकारतो आणि आणि आपले गोड गुलाबी आयुष्य जगतो, पण मरणाचे काय? म्हातारे होऊन मरताना नक्की का भीती नाही वाटणार किंवा पुरेसे जगून झाले असे वाटेल? का त्या भीतीपायी आपण सगळे तर्कशास्त्र सोडून खोटीनाटी पुस्तके वाचायला लागू की जी भ्रमाची अफू देतील? आपण मरणाचा सामना दैनंदिन करीत नाही आणि डोळ्याला झापड लावून जगतो. ही झापड आपण रस्त्यावरून चालत असताना बाजूला झोपलेले अजून मरण न पावलेले सांगाडे बघू देत नाही. जेव्हाही आपण अतिदारिद्र्य बघतो, पर्वताएवढा अन्याय बघतो आणि सरळ नाक ठेवून चालत राहतो तेव्हा, त्या प्रत्येक वेळी आपण माणुसकी हळू हळू जमिनीत गाडतो. स्वतःसाठीच नव्हे तर सगळ्या समाजासाठी. भगतसिंह, अर्नॆस्तो चे गेवारा इत्यादी क्रांतिकार्यांना म्हणून संपूर्ण-व्यक्ती म्हटले जाते. कोणावरही अन्याय सहन करणार नाही, अश्या त्यांच्या मंचावरून ते तसूभरही हलले नाहीत. बंदुकीच्या नळीत बघूनसुद्धा त्यांनी सत्यच सांगितले. मोडले पण वाकले नाहीत. माणूसकी शाबूत असल्याने, लोकांच्या आयुष्यात खरोखर बदल करीत असल्याने, चाकरीसाठी खोटे न मान्य करावे लागल्याने क्रांतिकारी आनंदात जगतात. मरणार तर सगळेच आहोत, पण बावीस तेविसाव्या वर्षी मरताना देखील थेंबभर अश्रूही गळू नये इतके त्यांना जीवनातून समाधान मिळालेले असते. मी नास्तिक का आहे सांगताना भगतसिंह म्हणतो, हिंदूंना ब्राह्मणाचा राजाचा पुनर्जन्म मिळेल अशी आशा असते, मुस्लिमांना किंवा ख्रिस्त्यांना स्वर्गसुखाची अपेक्षा असते. ही असत्ये स्वीकारली की मरणाची भीती नाहीशी होते. पण क्रांतिकार्याहून अधिक थोर ते काय? योग्य त्या कारणासाठी मरताना कसल्याही अलौकिक कल्पनेला अफू म्हणून प्यावे लागत नाही. भगतसिंहाला समजून घेण्यासाठी हा मुद्दा समजणे सर्वात महत्त्वाचे आहे. नास्तिक तर आपण सर्व आहोतच, पण क्रांतिकारी नव्हे. पण फाशीच्या आधी आपल्यापैकी किती गळतील? आता मरायच्या आधी मनातल्या मनात प्रार्थना केली तर कोणाला कळणार आहे आणि झाला तर फायदाच आहे असे किती म्हणतील? आकाशातून विमान कोसळायला लागल्यावर किंवा बुडालेल्या पाणबुडीत अडकल्यावर किती नास्तिक प्रार्थना करतील किंवा नाही? मुद्दा फाजीलपणाचा नव्हे, मुद्दा हा आहे की आपल्याला मरण येणार माहीत असून देखील मरणाची भीती आहे आणि हातातून सर्व निघून गेल्यावरतीसुद्धा आपण सहजासहजी मृत्यू स्वीकारणार नाही. भगत कबूल करतो की त्याला मरायचे नाही. फास गळ्याभोवती आवळल्यावर यातना होतील आणि सगळे संपून जाईल. परंतु त्याने आयुष्याचा लोकांसाठी पुरेपूर वापर केला आहे आणि त्याला दुःख ह्याचेच की त्याला लोकांची आणखी सेवा करता आली नाही. भगतसिंहाचा नास्तिकतावाद समजून घेताना त्याचे समाजाबाबतचे विचार समजणे महत्त्वाचे आहे. धर्माबरोबर लोकांचे कर्मठ आणि जुने विचारही निघून जातात. नास्तिक लोक सहसा पुरोगामी असतात. पण केवळ नास्तिक असून पुरत नाही. जर जग समजून घ्यायचे असेल तर केवळ 'देव नाही आता मला सगळे नीट दिसते' असे समजून चालणार नाही. कारण तसे बघितले तर देव नाही हे आपल्याला नवीन काहीच सांगत नाही. भ्रम दूर होतात पण सत्य दिसते का? तर नाही. इथे आपण विज्ञानाचा आधार घेतो. वैज्ञानिकांचे खरे मानतो. पण वैज्ञानिक खरे खोटे कसे ठरवतात? केवळ नास्तिक होणे पुरेसे नाही, भौतिकवादी असले पाहिजे. भौतिकवाद म्हणजे काय? भौतिकवाद म्हणजे जगात द्रव्य, ऊर्जा आणि त्यांतील आंतरिक संबंध ह्याशिवाय अजून काहीही नाही सांगणे. ह्याचा अर्थ देव नाकारणे, स्वर्ग नरक नाकारणे, भुते नाकारणे, आत्मा आणि पुनर्जन्म नाकारणे. हे त्यातूनच आले. तरी तुम्ही म्हणाल की अजूनही नवीन काहीच शिकायला मिळाले नाही आणि हे तर आम्हाला ठाऊकच आहे. भौतिकवादी विज्ञानाचा जेव्हा समाज रचना आणि उत्क्रांती समजून घेण्यासाठी वापर केला जातो तेव्हा मात्र अचानक वादंग तयार होतो. सीमित मतभेद तयार होतात. लोक गोंधळतात. भौतिकवादी समाजशास्त्र सांगते की मानवी समाजामध्ये एक तेढ आहे. ती स्वतःहून मिटत नाही तर आणखी प्रखर होत जाते, त्यामुळे सरकारे तयार होतात, त्यांचे मुख्य काम हेच की समाजात असलेल्या दोन वर्गांमधील तेढाचे विध्वंसात रूपांतर होऊ नये. मानवसमाजाचा इतिहास ह्याच विरोधाभासाचा इतिहास आहे. हे स्थित विचारसरणीत मान्य केले जात नाही. का बरे विरोधाभास आहे? उदाहरण देतो. बेरोजगारी. बेरोजगारीमुळे एक वर्ग हवालदील होतो पण दुसऱ्या वर्गाला फायदा होतो. त्यांना स्वस्तात नोकर मिळतात आणि नोकर सहजपणे नोकरी सोडूनही जाऊ शकत नाहीत. हा वर्ग सर्व प्रकारच्या समाजवादी विचारांना विरोध करतो. लोकांना अन्न, पाणी, घर आणि शिक्षणही हक्काने मिळू नये ह्याची व्यवस्था करतो कारण आर्थिक हताशता आणि नैराश्याने कामगार कितीही अवहेलना आणि यातना सहन करून स्वस्तात काम करतात, अधिक काम करतात. कदाचित इथपर्यंत आलेल्या वाचकाने आता कपाळाला तेढी घातली असेल. हे मान्य नाही असे काही जण म्हणत असतील. भगतसिंह समजायचा असेल तर ऐतिहासिक भौतिकवाद समजणे अनिवार्य आहे. नास्तिक बनलात ह्याबाबत कौतुक आहे, आता एक पायरी पुढे चला, भौतिकवादी बना. फक्त धर्मगुरूंनी झापडे लावून माणसाला मागास नाही ठेवले, कष्टकरी जनतेला मागास ठेवण्याचा वेगवेगळ्या वर्गांना इतिहासात फायदा झालेला आहे. त्यांनी स्वतःसाठी महाल आणि बागा बांधून घेतल्या, तिजोऱ्या भरल्या, पालखीतून वाहून घेतले. आज हा वर्ग हजारो करोड रुपये लग्नावर जाळतो आणि जनतेचा पैसे लुटण्यासाठी लोकशाहीला प्यादे बनवतो. व्यवस्थित खर्च करून ही सोय करतो कि लोकांनी बोट एकमेकांकडे दाखवावे. धर्माने लोक हरवतात, स्वतःचा घात करतात. पण धर्माने ते जिवंत राहतात, एकमेकांना आधार देतात. धर्म घालवायचा असेल तर ज्या पिळवणुकीमुळे त्याची गरज पडते ती मोडायला हवी. लोकांना नशेची गरज पडणार नाही असे वास्तव्य बनवायला हवे. भगतसिंहाशी मैत्री म्हणजे त्याचे विचार आत्मसात करणे. धर्मवाद, राष्ट्रवाद, जातीवाद ह्या माणसाला माणसापासून तोडणाऱ्या विचारांतून खाड्कन जागे होणे. आणि कटू असले, भीतीदायक आणि धोकादायक असले तरी सत्य स्वीकारणे हेच होय. तो तेव्हाही क्रान्तिकारी होता आणि आजही आहे. एवढेच मला म्हणायचे आहे. धन्यवाद. (15/09/2024) |